जेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी नरेंद्र मोदींना दिल्ली सोडून जायला सांगितलं!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. या सर्व किस्स्यांमध्ये नरेंद्र मोदींना वाजपेयींनी जेव्हा गुजरातचं मुख्यमंत्री केलं तो किस्सा फारच प्रसिद्ध आहे. 

मोदींना मुख्यमंत्री बनण्याची संधी, पण…

१९९५ साली झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळालं होतं. गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदाचे तीन दावेदार होते. नरेंद्र मोदी, शंकरसिंह वाघेला आणि केशुभाई पटेल. मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हा उत्सुकतेचा विषय होता. अखेर भाजपच्या नेतृत्त्वाचं गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी केशुभाई पटेलांच्या खांद्यावर सोपवली. नरेंद्र मोदींना त्याचवेळी दिल्लीला बोलवून घेण्यात आलं. पक्षाचं काम असं कारण त्यावेळी देण्यात आलं होतं. त्यानंतर १९९८ साली झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये देखील नरेंद्र मोदी यांचं काहीच योगदान नव्हतं. त्यानंतर केशुभाई पटेल यांच्याकडेच गुजरातचं मुख्यमंत्रिपद राहिलं. 

मोदींसाठी तो दिवस उगवणारच होता-

१९९५ साली नरेंद्र मोदींना पहिल्यांदा मुख्यमंत्री बनण्याची संधी निर्माण झाली होती. गुजरातचं नेतृत्त्व कुणाच्या हातात द्यायचं हा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा मात्र नरेंद्र मोदींचं नाव बाजूला करुन केशुभाई पटेल यांना संधी देण्यात आली. तेव्हा बाजूला करण्यात आलेले नरेंद्र मोदी भविष्यात गुजरातचे मुख्यमंत्री होतील, असं कुणालाही वाटलं नव्हतं. मात्र तो दिवस कधी ना कधी उगवणारच होता. 

…आणि केशुभाईंना राजीनामा द्यावा लागला-

२००१ साली गुजरातमध्ये मोठा भूकंप आला. गुजरातच नव्हे तर सबंध भारतात हाहाकार माजला होता. देश-विदेशातून गुजरातमध्ये मदत पोहोचवली जात होती. गुजरातमध्ये स्थिती इतकी गंभीर होती की प्रशासनाच्या सारं हाताबाहेर जात होतं. तत्कालीन मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांना ती स्थिती हाताळणं जमलं नाही. त्यांच्याविरोधात रोष वाढत गेला आणि परिणामी एक दिवस केशुभाई पटेल यांना आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. 

वाजपेयींचा नरेंद्र मोदींना फोन-

केशुभाई पटेल यांनी जेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत होते. २००१ सालातील तो ऑक्टोबर महिना होता. एके दिवशी नरेंद्र मोदींना थेट पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आणि पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना भेटायला बोलावलं. 

नरेंद्र मोदी तेव्हा पक्षाचे एक सामान्य कार्यकर्ते होते. त्यांनी तात्काळ पंतप्रधानांचं निवासस्थान गाठलं. अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या खास अंदाजात नरेंद्र मोदींना गुजरातमध्ये परत जाण्यास सांगितलं. नरेंद्र मोदींना यामागचं कारण कळालं नाही तेव्हा त्यांनी ते विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वाजपेयींनी त्यांना आपल्या खास शैलीतच उत्तर दिलं. दिल्लीमध्ये राहून पंजाबी जेवण खाऊन खाऊन तू खूप जाड झाला आहेस, असं वाजपेयी नरेंद्र मोदींना म्हणाले होते. नंतर जेव्हा त्यांना आपल्याला गुजरातचा मुख्यमंत्री केल्याचं कळालं तेव्हा त्यांच्यासाठी हा आश्चर्याचा धक्का होता. 

राजधर्माचं पालन करण्याचेही आदेश-

तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी नरेंद्र मोदी यांना २००१ साली हा सुखद धक्का दिला होता. गुजरातसारख्या राज्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती, मात्र २००२ साली गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांड घडलं, दंगली उसळल्या त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका झाली. त्यावेळी खुद्द अटल बिहारी वाजपेयी यांनी नरेंद्र मोदींना राजधर्माचं पालन करण्याचे आदेश दिले होते.