…फक्त या एका गोष्टीमुळे ‘ठाकरे’ सिनेमा फ्लॉप होऊ शकतो!

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये हा ट्रेलर एकाच वेळी प्रदर्शित करण्यात आला. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्याचा जीवनपट असल्याने या सिनेमाकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे. सिनेमाची ट्रेलरचीही त्यामुळेच सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. सध्या हा ट्रेलर सोशल मीडियात धुमाकूळ घालतो आहे. मात्र ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळानं त्यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. यामध्ये ट्रेलर आवडला सांगणारे अनेक आहेत, मात्र अनेकांनी एका गोष्टीवर आक्षेप नोंदवला आहे. हा आक्षेप एकसमान आहे.

कोणती गोष्ट जी सर्वांना खटकली?

ठाकरे सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. अनेकांना एकच गोष्ट खटकली, ती म्हणजे बाळासाहेबांचा आवाज… हिंदी ट्रेलरमध्ये बाळासाहेबांचा आवाज त्यांची भूमिका साकारणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकीचाच आहे. दुसरीकडे मराठी ट्रेलरमध्ये मात्र अभिनेते सचिन खेडेकर यांचा आवाज वापरण्यात आला आहे. बहुतांश लोकांनी यावर आक्षेप नोंदवला आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सचिन खेडेकर या दोघांचे आवाज बाळासाहेबांच्या पात्राला शोभत नाहीत किंवा ते तेवढे भिडतही नाहीत, अशी अनेकांची तक्रार आहे. सोशल मीडियावर अशा प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. सचिन खेडेकर यांचा आवाज फारच सपक वाटतो, असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण देखील जास्त आहे.

कोण देऊ शकतं योग्य आवाज?

बाळासाहेब ठाकरे यांच्या पात्राला आवाज देण्यासाठी व्हॉईस ओव्हर आर्टिस्टचा वापर करता आला असता. अनेकांचं तसं म्हणणं आहे. आवाजाचे जादूगार चेतन सशितल यांचं नाव अनेकांनी सुचवलं आहे. बॉलिवूड तसेच जाहिरात विश्वात भल्याभल्या अभिनेत्यांचे आवाज काढण्यात ते पटाईत आहेत. नेत्यांचे आवाजही ते अगदी हुबेहूब काढतात.

चेतन सशितल नुकतेच एबीपी माझा वाहिनीच्या माझा कट्टा कार्यक्रमात येऊन गेले. यावेळी त्यांना बाळासाहेबांबद्दल काही आठवणी सांगितल्या. बाळासाहेबांसमोर त्यांचाच आवाज कसा काढून दाखवला? याचा किस्साही त्यांनी सांगितला. त्यांचे हे किस्से चांगलेच लोकप्रिय आहेत.

चेतन सशितल यांनी काढलेला बाळासाहेबांचा आवाज-

चेतन सशितल यांचा पूर्ण कट्टा-

चेतन सशितल यांचा का विचार झाला नसावा?

सिनेमात बाळासाहेबांचा आवाज हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, असं असताना या गोष्टीचा गांभीर्याने विचार का झाली नाही?, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

खासदार संजय राऊत सिनेमाचे निर्माते आहे. चेतन सशितल यांनी संजय राऊत यांच्या भेटीचा एक किस्सासुद्धा सांगितला आहे. बाळासाहेबांचा हुबेहुब आवाज ऐकून संजय राऊतांना रडू कोसळलं, असा उल्लेख ते करतात. इतका हुबेहूब आवाज काढणाऱ्या चेतन सशितल यांची राऊतांना आठवण का झाली नाही? चेतन सशितल यांचा आवाज का वापरण्यात आला नाही?, असे अनेक प्रश्न आता निर्माण केले जात आहेत.

अजूनही संधी गेलेली नाही-

ठाकरे सिनेमाचा ट्रेलरच सध्या प्रदर्शित झाला आहे. तर सिनेमा २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे साधारणपणे १ महिन्याचा अवधी अजून शिल्लक आहे. चित्रपटाचे निर्मात्यांकडे अजूनही संधी आहे. लोकांची नाराजी लक्षात घेता बाळासाहेबांचा आवाज बदलण्याचा निर्णय अजूनही होऊ शकतो. तोच भारदस्त आवाज पुन्हा देता येऊ शकतो. असं झालं तर लोकांची नाराजी दूर होऊ शकते आणि सिनेमात लोकांना ज्या गोष्टीचा शोध आहे ती गोष्टही त्यांना अनुभवता येऊ शकते.